वड आणि मी

  • केरळच्या अनोळखी भूमीत, भाड्याने राहत असताना मी जेवणासाठी जवळच्या हॉटेलमध्ये जात असे, ज्यातून एका भव्य वटवृक्षाखाली गजबजणारा बस स्टॉप दिसत असे . माझ्या टेबलवरून मी रोज बसेस, गर्दी आणि दैनंदिन व्यवहारात गुंतलेले व्यस्त लोक पाहत होतो . बऱ्याच घटना माझ्यासमोर घडत असतानाही  एका क्षणी मला  माझ्यासाठी आणि त्या  वटवृक्षासाठी वेळ थांबलेला दिसत होता. या दृश्याने भावनांची लाट निर्माण झाली आणि मला  या शांततेचे ,स्तब्धतेच सार नमूद करण्याची प्रेरणा दिली. परिणामी अनुभवाने मला त्या क्षणांचे कौतुक करायला शिकवले जिथे वेळ आपला श्वास रोखून धरतो आणि अस्तित्वाचा गहन परस्परसंबंध प्रकट करतो.

वड आणि मी

 

बराच काळ झाला
पण त्याच्या इतका नवता
तो होता वर्षानुवर्षे
मी मात्र काल सकाळचा

वर्दळ सारी ,कोपरा बाजारी
रीघ गाड्यांची सर्वत्र………
माणसे विखरुनी …जशी पाने
भव्य त्या वडाखाली

मज शिवाय सर्वच शोधती गाडी
जी पोहोचवी त्यांना त्यांच्या गावी
मज जाणे कोठेही नसताना
न जाणे काय शोधी मन …काय पाही.

रेलचेल जगाची सारी
शांत न्याहळी तोही मीही
गर्दीत त्या एकटाच  उभा……… मीही
त्या वडा सारखा …..वडा शेजारी

वड मात्र वाकुनी उभा
जख्खड म्हातारा आजोबा कसा
का ध्यानास बसलेला प्राचीन
पद्मासनी ऋषी जसा

काळासंगे सुतमात्रही न बदलता 
स्वतः उनात चटक्यात उभा
देत छाया सर्वांना वर्षानुवर्षे
जरी छाटल्या फांद्या त्याच्या  …त्यालाच न विचारिता

त्याची मला…. नि माझी त्याला आज वाटली असावी सोबत
जरी गर्दीत होतो उभे आम्ही बरेच
ओसरता दिवस अन गर्दी….
राहिलो शिल्लक ………..एकटे आम्ही दोघेच
एकटे आम्ही दोघेच

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *